Saturday, 3 June 2023

मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार

 मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार


-पालकमंत्री दीपक केसरकर


'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'


            मुंबई, दि. 2 : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विभाग कार्यालयात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रहिवाशांच्या समस्या तत्का सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रहिवाशांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे हेच शासनाचे धोरण असून या समस्या सोडविल्या जातात, अशी रहिवाशांची भावना निर्माण झाली पाहिजे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, दिव्यांग आणि महिलांना शासन आणि महानगरपालिकेच्या योजनांमधून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामधून तयार होणारे उत्पादन विकले जाईल यासाठी त्याचे मार्केटिंग करण्यात यावे. या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपला दवाखाना योजनेचा सर्वसामान्यांना मोठा लाभ होत असून आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना करून अनधिकृत ड्रग्ज- दारूच्या व्यवसायाचे निर्मूलन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील सुमारे 263 रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गटारांची स्वच्छता, पाणी पुरवठा, रोजगार, शिधावाटप, कचरा निर्मूलन, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, पार्किंग आदी समस्यांचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


00000


विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा

 विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा


 


            मुंबई, दि. २ : बर्लिन येथे १७ ते २५ जून या कालावधीत होत असलेल्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंच्या 'स्पेशल ऑलिम्पिक' मध्ये महाराष्ट्रातून जात असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. २) राजभवन येथे निमंत्रित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


            यावेळी पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, 'स्पेशल ऑलिम्पिक्स भारत' च्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा तसेच विशेष ऑलिम्पिक महाराष्ट्रच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया उपस्थित होत्या.


            बर्लिन हे भारतासाठी भाग्यवान शहर आहे. या ठिकाणी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी देशाला १९३६ साली सुवर्णपदक मिळवून दिले होते, याचे स्मरण करुन बौद्धिक दिव्यांग खेळाडू विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. देशभरात 'विशेष ऑलिम्पिक भारत' या संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी ७५० क्रीडा केंद्र उभारले जाणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पदके जिंकून मायदेशी परत आल्यावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले. 


            संसदीय समितीचे अध्यक्ष असताना दिव्यांग लोकांसाठी विधेयक तयार केले होते असे सांगून कायद्यामध्ये दिव्यांगांसाठी २ टक्के नोकऱ्या आरक्षित करण्याची तरतूद असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            राज्यपालांनी बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्यामुळे संपूर्ण चमूचे मनोबल उंचावेल असे सांगून ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे यथायोग्य सन्मान होईल, याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


            शासनाने दिव्यांग खेळाडूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा - डॉ. मल्लिका नड्डा


            भारतातील बौद्धिक दिव्यांग खेळाडूंनी विशेष ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत १२०० पदके प्राप्त केली असून बर्लिन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकमध्ये १९० देशातून ७ हजार खेळाडू सहभागी होत असल्याचे विशेष ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा यांनी यावेळी सांगितले. बर्लिन विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत देशभरातून १९८ खेळाडूंसह ३०० जण सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांना राज्य शासनाने रोजगार देण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्याने देखील पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्काराची भरीव रक्कम जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            यावेळी संघाच्या व्यवस्थापिक हंसिनी राऊत, उपाध्यक्ष परवीन दासगुप्ता तसेच संस्थेचे पदाधिकारी व माजी खेळाडू उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना ट्रॅक सूट देण्यात आला.


            विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातून १४ बौद्धिक दिव्यांग खेळाडू व ५ प्रशिक्षक जाणार असून त्यापैकी १६ महिला असल्याचे यावेळी सां

गण्यात आले.


००००


350वर्षानंतर राज्यभिषेक

 



व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*

 *व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*


सकाळी दिवस सुरू झाला की ओट्यापाशी नाश्ता, स्वयंपाक सगळ्यांचे डबे भरणे, मुलांचे आवरणे, साफसफाईची कामे आणि ऑफीसला जाण्याची घाई. पुन्हा ऑफीस सुटलं की घरी पोहचून स्वयंपाक करायचा असल्याने घरी पोहोचण्याची घाई. या सगळ्या धावपळीत महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपण अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला नीट बसून खायलाही वेळ होत नाही. त्यामुळे व्यायामाला तर वेळ मिळेल याची शक्यताच नसते. घरातली कामे म्हणजे व्यायाम नाही. त्यातही दिवसभर बैठे काम असेल तर शरीराची फारशी हालचाल होत नाही. यामुळे कालांतराने पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवायला लागतात.


आजकाल कमी वयातच या सगळ्या तक्रारी उद्भवत असल्याने आपण आपल्या हातानेच आरोग्याची हेळसांड करत असल्याचे दिसते. शरीराचे कार्य सुरळीत चालायचे तर शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच. यासाठी रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया


*१. सूर्यनमस्कार...*

आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो, आंघोळ करतो. त्याचप्रमाणे १२ सूर्यनमस्कार घालण्याची शरीराला सवय लावली तर संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. १२ सूर्यनमस्कार घालायला मोजून १२ ते १५ मिनीटे लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर इतर गोष्टींप्रमाणेच आपण स्वत:साठी हा वेळ आवर्जून काढायला हवा. यामुळे आपल्याला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल.


*२. जीने चढ-उतार...*

आपण वरच्या मजल्यावर राहत असू तर लिफ्टचा वापर न करता आवर्जून जिन्यांचा वापर करायला हवा. ऑफीसमध्येही लिफ्टच्या ऐवजी जिन्यानेच चढ-उतार करायला हवी. यामुळे किमान व्यायाम होतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जीने चढ-उतार केल्यास आपला एन्ड्युरन्स चांगला राहण्यास मदत होते आणि स्टॅमिनाही वाढतो. 


*३. शतपावली...*

दिवसभराचे काम करुन आपण आधीच थकलेले असतो. त्यातही संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक आणि मागची आवराआवरी, दुसऱ्या दिवशीची तयारी हे करता करता आपण पार थकून जातो. त्यामुळे जेवण झाल्यावर कधी एकदा आपण आडवे होतो असे आपल्याला होऊन जाते. अशावेळी कंटाळा घालवण्यासाठी आपण टिव्ही पाहणे किंवा एकमेकांशी गप्पा मारणे हे आवर्जून करतो. त्या वेळात आपण घराच्या आजुबाजूला १५ मिनीटे शतपावली केल्यास दिवसभराचा ताण तर निघून जातोच पण अन्न पचण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. शरीराची हालचाल झाल्याने झोपही गाढ लागण्यास मदत होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




हा गेम कूणी खेळला आहे का ??-- आतापर्यंत " नवीन गेम आहे , सुरुवात करू शकता.😂😂🤪

 हा गेम कूणी खेळला आहे का  ??--  आतापर्यंत "  नवीन गेम आहे , सुरुवात करू शकता.😂😂🤪


Friday, 2 June 2023

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनयोजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा

 संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनयोजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा.


 


            मुंबई, दि. २ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनामधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.४८ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०० कोटी असा एकूण रु. १४८ कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आज २ जून २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे.


        मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रु.११९७ कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करुन दिला आहे. उपलब्ध निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.


            संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.


            या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १ हजार अर्थसहाय्य देण्यात येते.


        संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून निधीचा वितरणाचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल आयुक्तांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिलेल्या आहेत.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

 मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत


            मुंबई, दि. 2 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे वंदेभारत एक्स्प्रेसचे स्वागत करतील. 


            प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.


            चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उदघाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.


 मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे खालील प्रमाणे : 


            मडगाव, करमळी, थिवी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, कोलाड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).


०००००

Featured post

Lakshvedhi