Saturday, 3 June 2023

मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार

 मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार


-पालकमंत्री दीपक केसरकर


'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'


            मुंबई, दि. 2 : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विभाग कार्यालयात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रहिवाशांच्या समस्या तत्का सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रहिवाशांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे हेच शासनाचे धोरण असून या समस्या सोडविल्या जातात, अशी रहिवाशांची भावना निर्माण झाली पाहिजे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, दिव्यांग आणि महिलांना शासन आणि महानगरपालिकेच्या योजनांमधून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामधून तयार होणारे उत्पादन विकले जाईल यासाठी त्याचे मार्केटिंग करण्यात यावे. या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपला दवाखाना योजनेचा सर्वसामान्यांना मोठा लाभ होत असून आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना करून अनधिकृत ड्रग्ज- दारूच्या व्यवसायाचे निर्मूलन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील सुमारे 263 रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गटारांची स्वच्छता, पाणी पुरवठा, रोजगार, शिधावाटप, कचरा निर्मूलन, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, पार्किंग आदी समस्यांचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi