राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (१६ जानेवारी) निमित्त विशेष लेख :
स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना...
आज काल स्टार्टअप, इनोवेशन, यूनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमके काय, त्याचे वाढते आकर्षण का आहे, त्याला आज इतके महत्त्व का दिले जात आहे, चला तर याबद्दल थोडे जाणून घेऊयात ..!
स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचे नाविन्यपूर्ण (Innovative) स्वरूप. स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचा असा प्रकार असतो ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्यातरी महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले जाते, त्यासाठी नाविन्यपूर्ण विचारसरणीची मदत घेतली जाते. आता ही नाविन्यपूर्ण विचारसरणी म्हणजे नेमके काय?
नाविन्यपूर्ण म्हणजे एखाद्या समस्येवर नवविचाराणे, धोपट मार्ग न अवलंबता, (Out of Box thinking) उपाय शोधणे. नाविन्यपूर्ण उपाय - उत्पादने, प्रक्रिया, सेवा, तंत्रज्ञान किंवा कलाकृतीही असू शकतात. नाविन्यपूर्ण उपाय तंत्रज्ञानावरच आधारित असते असे नाही. दैनंदिन जीवनात आपण ज्याला जुगाड म्हणतो तेही एक नाविन्यपूर्ण संकल्पना/इनोवेशन असू शकते. म्हणून स्टार्टअप म्हणजे एखादे अॅप बनविणे किंवा इंटरनेटवरती काही चालू करणे असे नसून यात तंत्रज्ञानविरहित व्यवसायही असू शकतात.
तंत्रज्ञानविरहित स्टार्टअप म्हणजे जसे की नारळाच्या झाडावर चढण्यासाठी पाईपने बनवलेले चपलेसारखे उपकरण ज्यामुळे झाडावर चढण्याचे कसरतीचे काम सोपे झाले आहे. तसेच तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप म्हणजे जसे की Ola, Uber यांनी दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बनविलेले अॅप, ज्यामुळे ग्राहकांना घर बसल्या सुविधा, टॅक्सी व रिक्षा चालकांना सोप्या रीतीने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नावीन्यपूर्ण उपाय प्राप्त झाला आहे.
बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते परंतु, कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचे हेसुद्धा समजणे आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते, फरक इतकाच की त्या केंद्राला आपण स्टार्टअप म्हणत नाही.
राज्य शासनाच्या नियमानुसार असा उद्योग जो पुढील बाबींची पूर्तता करतो त्याला स्टार्टअप म्हटले जाते,
· कंपनीचा प्रकार (खासगी मर्यादित, नोंदणीकृत भागीदारी किंवा मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी) व
· वार्षिक उलाढाल (स्थापनेपासून कोणत्याही आर्थिक वर्षी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावी) व
· कंपनीचे वय (10 वर्षापेक्षा जास्त नसावे) व
· नाविन्यपूर्ण (Innovative) विचारसरणी अशा उद्योगांस भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअप म्हणून मान्यता प्राप्त होते.
स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांना व शहरातील सुरू झालेल्या उद्योगानांच स्टार्टअप म्हणायचे का? याचे उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण नाविन्यतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. स्थानिक समस्या व त्याला सोडवण्याचा उपाय स्थानिक नागरिकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांतून मिळू शकतो. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. नाविन्यपूर्ण संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरे की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी जास्तीत जास्त उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत.
स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी बऱ्याच घटकांची / बाबींची भूमिका महत्वाची ठरते. या परिसंस्थेतील विविध घटक/ बाबी म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन, ग्रँट, इन्क्युबेशन, सीड फंडिंग, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल, क्राउड फंडिंग, अॅक्सेलेरेशन, युनिकॉर्न, इत्यादी
स्टार्टअप बाबत महत्वाची बाब म्हणजे आजकाल स्टार्टअप्सची क्रेझ असली तरी प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नसते. स्टार्टअप म्हणजे नियमित व्यवसाय पद्धती नसून नवनवीन प्रयोग असतात. स्टार्टअप भविष्यात मोठा होईल याचा विश्वास असतो पण कोणतीही शाश्वती नसते. सर्व बाबी या प्रायोगिक तत्वावर सुरू होत असतात. नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरली तर नवउद्योजक स्टार्टअपच्या मदतीने कोट्यावधी कमवितो अन्यथा, पुन्हा नवकल्पनेला न्याय देण्यास प्रयत्नशील असतो.
भारत हा जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. लोकसंख्या लाभांश आपल्याकडे सर्वाधिक आहे. आजवर विविध आविष्कारांमुळे आपला देश जगात अग्रेसर ठरत आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट असो किंवा पहिले शल्यचिकित्सक म्हणून ओळखले जाणारे महर्षी सुश्रुत असोत ! भारतीय आविष्कारांचा एक समृद्ध वारसा आहे. पारंपारिक व्यवसाय ते नाविन्यपूर्ण उद्योग उभारून जगभरात ठसा उमटवणारे अनेक उद्योगपती देखील या भूमीला लाभले आहेत.
येणार काळ हा स्टार्टअप व नाविन्यतेचा असणार आणि काळाची हीच गरज ओळखून तरूणांना संधी देत, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण आविष्कारांची परंपरा अखंड राहावी यासाठी शासनाच्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. स्टार्टअप्सना व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन देऊन देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या स्तरावर स्टार्टअप इंडिया, नीती आयोग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अग्नी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इ. विभागामार्फत विशेष योजना व उपक्रम राबवले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे तसेच सर्वार्थाने देशास आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची सातत्यपूर्ण चाचणी करीत देशाला दिशा देणारे अग्रणी राज्य आहे. औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (Maharashtra State Innovation Society) कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दीष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्टअप्सना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.
नाविन्यता सोसायटी मार्फत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण व प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर, हिरकणी महाराष्ट्राची यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रम व यशस्वीतेमुळे देशातील एकूण ८८ हजार १३६ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स पैकी सर्वाधिक १६,२५० स्टार्टअप्स (१८%) महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. तसेच मुंबई मधे सुमारे ५ हजार ९०० पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 3४२, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत.
अभिमानाची बाब म्हणजे देशातील १०८ यूनिकॉर्न स्टार्टअप्सपैकी २५ यूनिकॉर्नस् (23%) महाराष्ट्रातील आहेत
नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. स्टार्टअप व नवउद्योजकानासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती, आवश्यक पाठबळ व सर्व बाबी आज रोजी उपलब्ध आहेत. युवकांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य शासन महत्वाची भूमिका बजावत आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अथक परिश्रमामुळे स्टार्टअप्सच्या क्षितिजावर महाराष्ट्राचे नाव अभिमानाने कोरले जाईल, असा विश्वास वाटतो. सळसळत्या उत्साहाने भरलेल्या उद्यमी युवाशक्तीच्या जोरावर स्टार्टअप नेशन ही ओळख मिळाल्यापासून जगात आपले मानांकन उंचावण्यासाठी आणि युवा वर्गातील उद्योजकतेला तळागाळापर्यंत नेण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया आणि भारताला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देऊया.
0 0 0
अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक), महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी
9420608942
राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (16 जानेवारी) निमित्त विशेष वृत्त
विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना
देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात
मुंबई, दि. 15 : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण 88 हजार 136 स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक 16 हजार 250 स्टार्टअप्स (18 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. त्याचप्रमाणे आज देशातील 108 यूनिकॉर्नपैकी 25 यूनिकॉर्न्स (23 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच 8 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबईमधे सुमारे 5 हजार 900, पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 342, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत.
स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल ठरत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप्स विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्टार्टअप्सना प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय दिवस
नवउद्योजक आणि स्टार्टअप्सने नाविन्यतेचा घेतलेला ध्यास, त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन रोजगाराच्या संधी व यामुळे देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला. नवउद्योजक, स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती व एक मजबूत परिसंस्था तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) हा नोडल विभाग आहे. सद्यस्थितीत भारतात सुमारे 2 लाख 44 हजार स्टार्टअप्सची नोंद झालेली आहे व यातील 88 हजार 136 स्टार्टअप्स उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) मान्यताप्राप्त आहेत.
स्टार्टअप्ससाठी राज्यात विविध धोरणे, योजना
स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनेक धोरणे, योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे आणि औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्टअप्सना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताह, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर व सीड फंड यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सन 2018 पासून कार्यरत आहे.
स्टार्टअप दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून सोमवारी 16 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमिताने नवउद्योजकांसाठी विशेष योजना, दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शक सत्र व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी 9420608942 यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईट आणि सोशल माध्यमांवर संपर्क साधता येईल.
000