सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 October 2022
नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर अंधेरी
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई, दि.15 :- भारत निवडणूक आयोगाने ‘166 - अंधेरी पूर्व’ विधानसभा' मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी ‘166 - अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.
(क्र. मुंउजि/प्रमाक/वा/003)
000
वाचनाची आवड
भावी पिढीला वाचनाची आवडत निर्माण करणे गरजेचे
मुंबई दि. १५ : जगातील जे देश वाचनाबाबत आघाडीवर होते तेच देश आपला सर्वांगीण विकास जलद गतीने करू शकले आहेत.आपला देश विकसित करण्याकरिता देशातील भावी पिढी म्हणजे लहान मुलांनमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मंत्रालयातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे याच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री श्री केसरकर म्हणाले, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. आपल्या भारत देशाला पुढे घेवून जाण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. भावी पिढी सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या मनातील संकल्पना पुढे घेवुन जाण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच पुस्तका संदर्भात ग्रंथालय हा वेगळा विषय असला तरी संबंधित विभागा सोबत संयुक्त बैठक घेवून ग्रंथालयाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालय चळवळ चालू करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ' वाचाल, तर वाचाल' हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे'
राज्यात पुस्तकाचे गाव ही संकल्पना सातारा जिल्ह्यातील भिलारगावापासून सुरुवात झाली आहे. पुस्तकाच्या गावात आता एक अभिनव संकल्पना आता पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे. कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२ हजार ते १५ हजार पुस्तके याठिकाणी आहेत. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे. यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषा अबाधित ठेवली आहे. मुंबई सारख्या राज्याच्या राजधानीत मराठी भाषा बोलतांना कोणालाच कमीपणा वाटता कामा नये.परराज्यातील नागरिकांनी येथे राहतांना मराठी बोलणे शिकले पाहिजे.वाचनाची चळवळ पुढे चालू राहिली तर मराठी भाषा प्रगल्भ होवू शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
000
वांद्रे किल्ला
वांद्रे किल्ला परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करा
मुंबई, दि.१५: वांद्रे येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित रित्या पर्यटन करता यावे यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपायोजना कराव्यात असे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
एच पश्चिम वॉर्ड,वांद्रे येथे आज पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार अॅड. आशीष शेलार , सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले, खार स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी. तसेच महानगर गॅस ची पॉईप लाईन येत नसल्यामुळे या विषयी महानगर पालिका, मेट्रो व महानगर गॅस यांची संयुक्त बैठक मंगळवारी घेण्यात येईल व यावरती त्वरित उपाय काढण्यात येईल. खार रोड पश्चिम येथील राकेश मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एस. आर. ए. ने दहा दिवसात प्राथमिक शाळा मुंबई महापालिकेला पूर्ण कार्यवाही करुन हस्तांतरित करावी. तसेच शंकर दीप हाउसिंग सोसायटीला मुंबई महापालिकेने सात दिवसात पाण्याचे कनेक्शन देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले.
दुर्ग सेवक, सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागाचे रोहित देशमुख यांनी ऐतिहासिक वांद्रे किल्ल्याचे पावित्र्य जपून येथील परिसरात कायदा व सुव्यवस्थेची गरज आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरनासाठी उपाययोजना कराव्यात अशी तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री श्री. लोढा यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपायोजना करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी तसेच बांद्रा किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे अशा सूचना केल्या.
नागरिकांनी २४२ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले.तर यापैकी १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
'पालकमंत्री आपल्या भेटीला' हा उपक्रम दि. १९ ऑक्टो रोजी पी नॉर्थ वॉर्ड, मालाड (पश्चिम) येथे होणार असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.
000





