Wednesday, 23 March 2022






 

 अमृत संस्थेसाठी 20 पदांना मान्यत

                                             - विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचे कामकाज गतीने व्हावे यासाठी 20 पदे मंजूर झाली असून लवकरच ही पदे भरली जाणार असून मुंबई तसेच नाशिक येथील कार्यालय लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            नाशिक येथील महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेची गेले दोन वर्ष स्थापना होऊनही अद्याप कोणतेच काम सुरू नाही. शासन हे कार्यालय पूर्ण क्षमतेने कधी सुरू करणार तसेच इतर मागास बहुजन कल्याण घटकातील विद्यार्थ्यांच्या योजना कधी राबविणार याबाबत लक्षवेधी विधानसभेत विधानसभा सदस्य इंद्रनिल नाईक यांनी मांडली होती.

              मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचे कामकाज गतीने व्हावे यासाठी २० पदे मंजूर झाली असून लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. मुंबई तसेच नाशिक येथील कार्यालय लवकरच सुरू होणार आहे.तसेच संस्थेमार्फत इतर मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शनही घेण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षा, तसेच नामवंत संस्थाशी करार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

 महाराष्ट्रातील 11 महिला ‘भारत बदलणाऱ्या महिला’ पुरस्काराने सन्मानित.

देशातील एकूण 75 महिलांना पुरस्कार प्रदान.

            नवी दिल्ली, दि. 22 : विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना ‘भारत बदलणा-या महिला’ (Women Transforming India) या पुरस्काराने निती आयोगातर्फे सोमवारी सायंकाळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या 11 महिलांचा समावेश होता. देशातील एकूण 75 महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

            निती आयोगच्यावतीने ‘भारत बदलणा-या महिला’ (Women Transforming India) या 5 व्या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रशसंनीय कार्य करणाऱ्या 75 महिलांना गौरविण्यात आले. याप्रसंगी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सल्लागार अण्णा राय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले.

              माजी पोलीस महासंचालक तथा पुदुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी, माजी सहायक महासचिव संयुक्त राष्ट्र लक्ष्मी पुरी, डीआरडीओच्या एरोनॉटीकल सिस्टमच्या महासंचालक डॉ. टेसी थॉमस, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष अरूंदती भट्टाचार्य, नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, अभिनेत्री आणि लोक गायीका इला अरूण, यासह ट्रॅक आणि फिल्ड ऍथलीट शायनी‍ विल्सन, टोक्यो ऑलिम्पिक विजेती मुष्ठियोद्धा लवलीना बोरगोहेन, जागतिक प्रथम क्रमांची पॅरा बॅडमिटंनपटू मानसी जोशी, टोक्यो ऑलिम्पियन जिम्नॅस्ट प्रणीती नायक, मुष्ठियोध्दा सिमरनजित कौर यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील 11 महिलांना ‘भारत बदलणा-या महिला’ पुरस्कार

            मुंबईच्या डॉ. अर्पणा हेगडे, या अरमान नावाने गैरशासकीय संस्था चालवितात. या संस्थेच्यावतीने गर्भवती माता, नवजात अर्भक आणि पाच वर्षापर्यंतच्या बालकांची काळजी घेतली जाते. आतापर्यंत 27 लाख माहिला आणि बालकांना त्यांनी आवश्यक ती मदत पुरविली आहे. ही संस्था 19 राज्यात काम करते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या किलकारी आणि मोबाईल अकादमी या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबाजवणी अरमानच्या माध्यमातून केली जाते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

            नागपूर जिल्ह्यात क्रांती ज्योती महिला बचत गट (रूलर मार्ट)चालविणाऱ्या दिपा चौरे आहेत. यांच्या बचत गटाच्यामाध्यमातून ग्रामीण भागात उच्च गुणवत्तेचे उत्पादन तयार केली जातात. त्यांनी 350ते 500 महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

            माणदेशी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकरीत्या सक्षम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनाही सन्मानित करण्यात आले. या बँकेचे लक्ष्य वर्ष 2024 पर्यंत 10 लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे आहे.

            मुंबईतील रीसिटी नेटवर्क प्रा. ली. च्या मेहा लाहीरी या स्वच्छता यावर काम करतात. प्लास्टिक कचरा हे आजचे आव्हान असून त्याशी निगडीत काम करणा-या कामगारांचे समुपदेशन, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. संस्था स्थापनेपासून 69% पेक्षा जास्त महिला कचरा कामगारांवर संस्थेने केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या याइकामाची दखल घेत त्यांना ‘भारत बदलणा-या महिला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            पुणे येथील स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रेमा गोपालन यांनाही सन्मानित करण्यात आले. त्या पुरस्कार स्व‍िकारायला येऊ शकल्या नाही परंतू त्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधीने हा पुरस्कार स्व‍िकारला. त्यांनी संस्थेच्या माध्यातून बदलत्या नैसर्गिक वातावरणानुसार ग्रामीण भागात महिलांना शेती करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांची संस्था महाराष्ट्र, केरळ, बिहार, ओरिसा या राज्यांतही काम करते. त्यापर्यंत त्यांनी 150,000 ग्रामीण महिला शेतकऱ्यांना प्रशिक्ष‍ित केलेले आहे.

            पुण्यातील आदया ओरीजनल्स प्रा. ली. संस्थेच्या सायली मराठे यांना त्यांच्या ऐतिहासिकपणा जपणाऱ्या चांदीच्या दागीने बनविण्याच्या कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

            मुंबईच्या शांती राघवन या अनऐबल इंडिया गैरशासकीय संस्थेच्यामाध्यमातून दिव्यांगासाठी मागच्या 2 दशकांपासून काम करतात. देश घडविण्यात दिव्यांगाची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या करातून नवनवीन प्रकल्प उभारले जातात. दिव्यांगाचे अस्तित्व अन्यसारखेच महत्वाचे असल्याचे अधोरेखित त्या करीत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांनाही ‘भारत बदलणाऱ्या महिला’ या पुरस्काराने सन्‍मानित करण्यात आले.


            मुंबईतील टिच फॉर इंडिया आणि द आकांक्षा फाउंडेशन च्या माध्यमातून शाहीन मिस्त्री या वर्ष 2008 पासून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी काम करीत आहेत. आजपर्यंत या संस्थेने 32,000 मुलांना टिच फॉर इंडियाच्या माध्यमातून शिक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे 33 दक्षलक्ष बालकांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले मात्र त्या उपस्थित राहू शकल्या नाही.

            पुण्याच्या सुलज्जा मोटवानी यांनी प्रदुषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी काइनेटिक ग्रीन एनर्जी ॲण्ड पावर सोलुश्यन या कंपनीच्या माध्यातून प्रदुषण कमी करणारे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात असणारे वाहन तयार केले. या वाहनाची किंमतही परवडण्यासारखी ठेवली. त्यांचा लाभ लोकांना होत आहे. यामाध्यमातून आतापर्यंत 50 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. यासह मुंबईच्या फुट डॉक्टर पायांची निगा कशी राखायची बद्दलची माहिती कलर मी मॅड प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून त्रिशला सुराणा देत असतात. यांना आणि मुंबईच्याच ओखई या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांना रोजगार देणाऱ्या किर्ती पुनिया यांनाही सन्मानित करण्यात आले मात्र, याही कार्यक्रमात उपस्थित होऊ शकल्या नाहीत.

 जलसंपदाचे 104 प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस

- जयंत पाटील

            मुंबई, दि. 22 : जलसंपदा विभागामार्फत पुढील दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

            महसूल, वन, जलसंपदा, उद्योग, ऊर्जा व कामगार, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री.पाटील बोलत होते.

            जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, डावा-उजवा कालव्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रमुख कालवा ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. गोदावरी खोऱ्यात प्रवाह वळण योजनेद्वारे पाणी वळविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी नदीजोड प्रकल्प राबविले जात आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामे तातडीने सुरु करुन पूर्णत्वास नेले जातील. निम्न माणिकडोह प्रकल्पाचा प्रस्ताव प्रक्रियेत आहे याला कोणाचाही विरोध नाही. मंत्रिमंडळही याबाबत सकारात्मक आहे. निळवंडे कालव्याचा प्रश्न सुटला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असून या कामाला प्राधान्य दिले आहे. तसेच जीगाव प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधींसमवेत तातडीने बैठक घेण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी स्पष्ट केले.

            महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महसूल विभाग सर्वसामान्यांशी निगडित विभाग असून या विभागांतर्गत अनेक कामे केली जातात. ही कामे सहजतेने आणि बिनचूक झाली पाहिजेत, अशी शासनाची भूमिका असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन 2024 पर्यंत विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होतील. त्याचबरोबर सातबारा नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा नवीन सातबारा ऑनलाईन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच पदे भरली जातील.

            उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, विदर्भातील उद्योगांना सर्वात जास्त सवलती दिल्या जात आहेत. मुद्रांक शुल्क माफी, वीज सबसिडी, अशा विविध सवलती शासनाकडून विदर्भातील उद्योगांसाठी देण्यात येत आहे. विदर्भात उद्योगवाढीसाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यात नवीन एमआयडीसी स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

            अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात आरोग्य, पोलीस विभागाप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभागानेही कौतुकास्पद काम केले आहे. या काळात राज्यातील 56 हजार धान्य दुकानांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत धान्य पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे. या काळात 8.50 टन धान्याचे अविरतपणे वाटप करण्यात आले. अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत शासन कटिबद्ध आहे.

            ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत येत्या काळात 10 हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये रस्त्यांचा दर्जाही राखला जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. घरकुल योजनेंतर्गत या वर्षी पाच लाख घरे चार महिन्यात बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आरोग्य विभाग काम करणार आहे. नामांकित खासगी रुग्णालयातील स्वच्छतेप्रमाणे शासकीय रुग्णालयांमध्येही स्वच्छता असावी, हीच आमची भावना आहे. ही सुविधा मिळावी यासाठी सर्व यंत्रसामुग्री आणि आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी निधी दिला जाईल. शहरीकरण वाढले असून हे प्रमाण लक्षात घेता राज्यातील प्रत्येक नगरपंचायतीमध्ये स्वतंत्र हेल्थ केअर सेंटर असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल कॅन्सर डायग्नॉसिस व्हॅन दिल्या जाणार आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय, सिटीस्कॅन, डायलिसिस साहित्य, टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

            ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. याबाबतचा आराखडा तयार करुन तसा प्रस्ताव उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

            वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, नागपूर विभागांतर्गत उमरेड भागात विद्युत प्रवाहामुळे वाघाचा मृत्यु झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना वन कोठडी सुनाविण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            या चर्चेत सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष जैस्वाल, संजय कुटे, सुनिल शेळके, सुनिल प्रभू, माधुरी मिसाळ, तुषार राठोड, प्रकाश आबिटकर, सरोज अहिरे, राहुल पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

००००


             


             


             








 

जय हिंद

 🔥⛳🔥⛳🔥⛳🔥⛳🔥

           *आज शहीद भगतसिंग,*

              *सुखदेव व राजगुरू* 

                *यांची पुण्यतिथी*

🔥⛳🔥⛳🔥⛳🔥⛳🔥


     २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती

     भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज पुण्यतिथी आहे. २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो. 

                  भगतसिंग -

       भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. 

लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्‍या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. 

                        राजगुरु - 

        शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 

                    सुखदेव - 

      सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूरमध्ये दि.१५ मार्च १९०७ रोजी लायलपूर येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.


💐💐💐

जय hind


 

Featured post

Lakshvedhi