मुख्यमंत्र्यांनी दावोसमधून अनुभवला भारतातील
पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार
पुणे, दि. २० : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला जागतिक स्तरावर ‘टूर डी फ्रान्स’सारख्या स्पर्धांना असलेली प्रतिष्ठा मिळली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस येथील औद्योगिक परिषदेसाठी जाण्यापूर्वी शुभारंभ कार्यक्रमात जगभरातील सायकलपटूंचे स्वागत केले होते. दावोस येथे राज्याच्या औद्योगिक विकासासाठी विविध उद्योग संस्थांशी सामंजस्य करार करण्यात व्यग्र असतांनाही त्यांनी राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि या महत्वाच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपवर स्पर्धेतील थरार अनुभवला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असतांना त्यांनी सायकलपटूंच्या कौशल्याचेही कौतुक केले. सायकलपटूंना पुण्यात मिळणारा प्रतिसाद, उत्सवाचे स्वरुप, सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेली तरुणाई पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ही स्पर्धा राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रेरक ठरेल आणि सायकलचे शहर ही पुण्याची जुनी ओळख नव्या रुपात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment