‘हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज
-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५२ एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री, संत-महंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानावर युद्धपातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, मैदानालगत दोन भव्य टेन्ट सिटी उभारण्यात आल्या आहेत. एका टेन्ट सिटीत सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता असून, यासोबतच शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी स्वच्छता, स्वयंसेवक व्यवस्था, विविध प्रकारचे मोफत सेवा स्टॉल्स, तसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजार नेत्र तपासणी व विशेष कर्करोग तपासणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था करण्यात आली असून, याचा लाभ सुमारे १० लाख भाविकांना घेता येणार आहे. निवास, भोजन, वाहतूक, आरोग्य व सुरक्षा याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रचार–प्रसिद्धी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment