मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी गेले आहेत. दिवसभराच्या व्यग्र कार्यक्रमात दोन्ही देशातील वेळांचा फरक लक्षात घेऊन त्यांनी स्पर्धेच्यावेळी थेट प्रक्षेपण पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांनी देखील थेट प्रक्षेपण पाहत स्पर्धेचा आनंद घेतला.
एका बाजूला महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशांतील उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार होत असताना, दुसऱ्या बाजूला राज्यातील क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या या ऐतिहासिक घडामोडीकडे दिलेले विशेष लक्ष क्रीडा क्षेत्राला निश्चितपणे प्रोत्साहन देणारे आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, अत्याधुनिक आयोजन आणि विविध देशांतील नामवंत सायकलपटूंचा सहभाग यामुळे ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ने पुण्याला जागतिक सायकलिंगच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावरून या स्पर्धेचा थरार अनुभवणे, हे आयोजक, खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींसाठी मोठे प्रोत्साहन ठरले असून, यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment