कुर्ला रेल्वे परिसरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासंदर्भात
केंद्र सरकारशी चर्चा करणार
- मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि.10 : कुर्ला विभागातील साबळे नगर, संतोषी माता नगर व क्रांती नगर येथील रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासंदर्भात केंद्राकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. दिल्लीमध्ये केंद्र सरकारशी संबंधित विषयांसाठी बैठकीत या प्रकल्पाचाही समावेश करून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, अनंत नर, श्रीमती मनिषा चौधरी यांनी रेल्वे वसाहतीत गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, यासंदर्भात सूचना मांडली होती.
कुर्ल्यातील 3.87 एकर रेल्वेच्या जागेवरील 1241 झोपड्यांचे नंबरिंग पूर्ण असून 1188 झोपड्यांचे बायोमेट्रिकही झाले आहे. सर्वेक्षण व बायोमेट्रिक करण्यास रेल्वेने दिलेल्या संमतीनुसार कार्यवाही पूर्ण केली आहे, अशी माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.
मुंबईतील गांधी नगर-इंदिरानगर परिसरातील पुनर्वसनासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री श्री.देसाई म्हणाले की, पात्र झोपडपट्टीधारक निकषांत बसत असतील आणि संबंधित झोपडपट्टीधारकाची माहिती लेखी स्वरूपात असल्यास पुनः सर्वेक्षणाचे निर्देश दिले जातील.
नवी मुंबईतील पुनर्वसन समस्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री श्री.देसाई म्हणाले की, यासंदर्भात म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना पीएपी योजनेत समाविष्ट करण्याचा पुनर्विचार केला जाईल.
No comments:
Post a Comment