विधानसभा लक्षवेधी
अंधेरी सबवे परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर
अधिवेशन संपल्यानंतर उच्चस्तरीय बैठक
- मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि 10 : मोगरा नाला हा अंधेरी सब वे मधून वाहत असून अंधेरी भुयारी मार्ग हा खोलगट भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या वारंवार उद्भवते. सध्यातरी महानगरपालिका पंप लावून तात्पुरती व्यवस्था करते; मात्र हा कायमस्वरूपी उपाय नाही. आजूबाजूच्या वस्तीमुळे रुंदीकरण तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने पर्यायी मार्गांचा शोध घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि आयआयटीच्या तज्ज्ञांचा संयुक्त सल्लागार गट नेमण्यात आला असून या संदर्भात अधिवेशन संपताच पहिल्या आठवड्यात उच्चस्तरीय बैठक येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य मुरजी पटेल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.देसाई म्हणाले की, या बैठकीत स्थानिक आमदारांसह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, विभागाचे प्रतिनिधी, नव्याने नेमलेले तांत्रिक सल्लागार, उच्चस्तरीय अधिकारी असतील.
या समितीने ९८१ मीटर लांबीचा बंदिस्त नाला (टनल) उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाचा आर्थिक व्यवहार्यतेसह सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास महानगरपालिका करत असल्याचेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment