अंधेरी येथील झोपड्या निष्कासन प्रकरणी
प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ३० दिवसात चौकशी
- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. ११ : मुंबईच्या अंधेरीमधील मौजे कोंडीविटा येथे रस्ता रुंदीकरणासाठी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण न करता झोपड्या निष्कासित केल्याप्रकरणी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३० दिवसात चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्या कुणालाही पाठीशी न घालता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य ॲड.अनिल परब यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी १४४ झोपड्या बाधित झाल्याची माहिती देऊन मंत्री उदय सामंत म्हणाले, या जागेशेजारी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होत आहे. त्या प्रकल्पाच्या जागेत येथील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. तसेच या झोपडीधारकांच्या झोपड्या निष्कासन प्रकरणी चौकशीदरम्यान आरोप असणारे संबंधित अधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल.
00000
No comments:
Post a Comment