ब्रह्मपुरीतील रेती वाहतुकीप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध
आठवड्याभरात विभागीय चौकशी
- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
नागपूर, दि. 13 : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील बेकायदा रेती वाहतूक प्रकरणी ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या विभागीय चौकशीचा अहवाल येत्या आठवड्यात मागवून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी तसेच आवश्यक असल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी माहिती दिली.
राज्यमंत्री श्री. भोयर यांनी सांगितले की, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कायद्यानुसार कारवाई न करता, केवळ वाहतूक पोलिसांमार्फत किरकोळ दंड आकारून संबंधित ट्रॅक्टर सोडून दिल्याचे निर्दर्शनास आले आहे. या प्रकारामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अन्वये विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. ही चौकशी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या चौकशीचा अहवाल तातडीने मागवून घेण्यात येईल.
या प्रकरणी शासनावर कोणताही दबाव नाही आणि दोषींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र प्रत्येक प्रकरणात ठराविक कार्यपद्धतीनुसारच कारवाई केली जाते, असे राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment