भंडारा जिल्ह्यातील वाळू डेपोतील बेकायदा उत्खननप्रकरणी
अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करणार
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, दि. 13 : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील वाळू डेपोतून बेकायदा उत्खननप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यास निलंबित करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी हा प्रश्न मांडला होता. त्यावर मंत्री बावनकुळे म्हणाले की, भंडारा जिल्ह्यातील मौजे बेटाळा दक्षिण व बेटाळा उत्तर वाळू डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात वाळू डेपोमध्ये २ मे २०२५ रोजी तलाठ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या अहवालात तब्बल ३४ हजार ६०० ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन झाल्याचा उल्लेख आहे. तत्कालीन तहसीलदार महेश्वर कोळणे व उपविभागीय अधिकारी गजेंद्र पांडे यांनी या अहवालावर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना, कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच तेथील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी ईटीएस सर्वे न केल्याचेही आढळून आले आहे.
या प्रकरणात तत्कालीन अधिकारी गजेंद्र पांडे यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल. तसेच निवृत्त अधिकारी महेंद्र सोनवणे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार असून, फौजदारी चौकशी केली जाणार आहे. संबंधित डेपो धारक कंपनीवर बेकायदा उत्खननाचा गुन्हा दाखल करून अंदाजे ६५ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही सखोल तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment