होलार समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल
- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
नागपूर, दि १२ : होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल. यासाठी ५० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या वेळी दिली.
विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज व्यक्त केली.
होलार समाजाला काही भागात मातंग, काही ठिकाणी चांभार, तर काही ठिकाणी होलार म्हणून संबोधले जाते. त्यामुळे त्यांच्या रोटी-बेटी व्यवहारांवर परिणाम होतो आणि मूळ जात ठरवण्यात अडचणी येत असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.
होलार समाजातील अनेक जणांच्या जात नोंदी चुकीच्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना लाभ मिळत नसल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, चुकीच्या नोंदींबाबतचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला असून याचा शासनस्तरावर अभ्यास सुरू आहे. पुढील दीड महिन्यांत यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment