जिल्हा परिषद शिक्षकाकरिता नवीन बदली धोरण लवकरच
- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
नागपूर, दि. 12 : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसंदर्भात गेल्या काही वर्षांत वारंवार जारी झालेले शासन निर्णय व शुद्धीपत्रके या पार्श्वभूमीवर संपूर्ण बदली धोरण नव्याने तयार करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
विधानसभा सदस्य मोहन मते, विजय वडेट्टीवार, श्रीमती नमिता मुंदडा, सुमित वानखेडे, प्रवीण स्वामी, भास्कर जाधव, नाना पटोले, गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2025 मधील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत सुमारे 66,520 शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिली. विशेष संवर्ग 1 मधील 12 हजार शिक्षकांपैकी 504, तर विशेष संवर्ग 2 मधील 45 हजार 888 शिक्षकांपैकी 4 हजार 861 शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. बदली प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते; मात्र यामुळे शैक्षणिक वर्षात अडथळे निर्माण होतात म्हणून पुढील वर्षापासून ही प्रक्रिया मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त शिक्षकांमुळे कुठलीही जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 1,90,903 शिक्षक पदे मंजूर असून त्यापैकी 1,76,614 पदे कार्यरत आहेत. सुमारे 15,158 पदे रिक्त असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment