कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी
– मंत्री मंगलप्रभात लोढा
नागपूर, दि. १४ : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरू असलेल्या कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू राहील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, 2007 नंतर बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस योजना नव्हती. सध्याची योजना ही रोजगारासाठी नव्हे, तर प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली योजना निवडणुकीनंतर बंद न करता पाच महिने वाढविण्यात आली. याशिवाय पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अर्थसंकल्पातही 418 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये नवीन, रोजगाराभिमुख व लोकप्रिय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. अल्पकालीन (शॉर्ट टर्म) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून, पहिल्याच टप्प्यात ५५ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
तसेच ‘मुख्यमंत्री स्वरोजगार योजना’ सुरू करण्यात आली असून, पहिल्या वर्षात ५ लाख बेरोजगारांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी ५ लाख विद्यार्थ्यांना ३ टक्के व्याजदराने ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. केवळ कर्जपुरवठाच नव्हे, तर प्रत्येक आयटीआयमध्ये इन्क्युबेशन सेंटर, मेंटरशिप ग्रुप उभारले जाणार असून, ऑनलाईन प्रश्न-उत्तरासाठी स्वतंत्र ॲपही तयार करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.
दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ जानेवारीपासून विशेष नवीन योजना अमलात आणली जाईल, असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
या लक्षवेधीत सदस्य जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment