शनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहार
प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत
– गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
नागपूर, दि १४ : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर (शनिशिंगणापूर) देवस्थानात ऑनलाईन पूजा, चढावा व लाईव्ह दर्शन सेवांमधून मोठ्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, सन २०१८ पासून शेमारू या कंपनीला शनिदेवाचे लाईव्ह दर्शन देण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर 2022 ते 2025 या कालावधीत देवदान विविध कंपन्यांच्या श्री मंदिर, उत्सव, वामा आणि शेमारू ॲपवर ऑनलाईन पूजा, चढावा आणि लाईव्ह दर्शन सेवा देण्याची परवानगी देण्यात आली.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या 24 सप्टेंबर 2022 च्या बैठकीत ऑनलाईन पूजा सेवा देणाऱ्या एजन्सींना परवानगी देण्याचे अधिकार कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. मात्र, त्यानंतर उपकार्यकारी अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आली आहे.
तपासात एक कर्मचाऱ्याने सुमारे 37 लाख 15 हजार रुपये, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने 32 लाख 5 हजार रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. ऑनलाईन पूजा व चढाव्याची रक्कम थेट देवस्थानच्या बँक खात्यात जमा न करता ती परस्पर स्वतःकडे ठेवण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून ते 8 डिसेंबर 2025 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहितीही राज्यमंत्री यांनी दिली.
या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस महासंचालक (महाराष्ट्र सायबर) यांच्या निरीक्षणाखाली पुढील तपास सुरू आहे. तपास तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर पुढील कारवाई करण्यात येईल, तसेच अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी कठोर पावले उचलली जातील, असे गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment