मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या
विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ
सातारा, दि. २६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
फलटण येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रम व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.
फलटण ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाने या परिसराला दुष्काळमुक्त करण्यासाठी नीरा देवघर कालव्याच्या कामातील अडचणी दूर करून कामाला सुरुवात केली आणि प्रकल्पाचे पाणी फलटण आणि माळशिरसला देणे शक्य करून दाखविले आहे. माणदेशाच्या साहित्यात दुष्काळावरील चित्रण दिसून येते, हा दुष्काळ दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर हरित माणदेश तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment