Monday, 20 October 2025

माझ्या प्रिय देशवासियांनो

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 
   
 ऊर्जा आणि आशा-आकांक्षांनी भरलेल्या दिवाळीच्या या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. अयोध्येत राममंदिराची भव्य निर्मिती केल्यानंतर ही दुसरी दिवाळी आहे. प्रभू श्रीराम आपल्याला मर्यादांचे पालन करण्याची शिकवण देतात आणि त्याबरोबरच आपल्याला अन्यायाविरोधात लढण्यास देखील शिकवतात. आपण काही महिन्यांपूर्वीच ऑपरेशन सिंदूर दरम्यानही पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने मर्यादांचे पालन देखील केले आणि अन्यायाचा सूड देखील घेतला. 
   
 यावेळची दिवाळी यासाठी देखील विशेष आहे कारण देशाच्या अनेक जिल्ह्यात, दुर्गम भागांमध्ये पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे उजळतील. हे ते जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतीचे मुळापासून उच्चाटन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात आपण पाहिले आहे की कशा प्रकारे अनेक व्यक्ती हिसेंच्या मार्गाचा त्याग करून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाल्या आणि त्यांनी देशाच्या राज्यघटनेवर विश्वास दाखवला आहे. देशासाठी ही खूप मोठी कामगिरी आहे. 
   
 या ऐतिहासिक कामगिरींमध्येच गेल्या काही दिवसात देशात भविष्यवेधी ऐतिहासिक सुधारणांची देखील सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कमी केलेल्या जीएसटीचे दर लागू झाले. जीएसटी बचत उत्सवात देशवासियांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे. 
   
 अनेक संकटातून वाटचाल करणाऱ्या जगात आपला भारत स्थैर्य आणि संवेदनशीलता या दोघांचे प्रतीक म्हणून उदयाला आला आहे. येणाऱ्या काळात आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था देखील बनणार आहोत. 
   
 विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या वाटचालीत एक नागरिक म्हणून आपले मुख्य दायित्व आहे- आपण देशाविषयीच्या आपल्या कर्तव्याचे पालन करणे. 
   
 आपण स्वदेशीचा अंगिकार केला पाहिजे आणि अभिमानाने म्हटले पाहिजे- हे स्वदेशी आहे. आपण एक भारत-श्रेष्ठ भारताच्या भावनेला देखील प्रोत्साहन दिले पाहिजे. आपण स्वच्छतेचे पालन केले पाहिजे. आपण आपल्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. जेवणात तेलाचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी केले पाहिजे आणि योगसाधनेचा अंगिकार केला पाहिजे. हे सर्व प्रयत्न आपल्याला अधिक जास्त गतीने विकसित भारताच्या दिशेने घेऊन जातील. 
   
 दिवाळी आपल्याला याची देखील शिकवण देते की जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी होत नाही तर उलट त्यात वाढ होते. याच भावनेने या दिवाळीला आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला, सद्भावना, सहकार्य आणि सकारात्मकतेचे दिवे उजळायचे आहेत.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
 
   
 तुमचा,
नरेंद्र मोदी.
 
 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi