न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी येथील आर्थिक, प्रशासकीय
कामांची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा
- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई, १४ : न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी येथील आर्थिक व प्रशासकीय कामांची सखोल चौकशी करून १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानभवन येथे न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वी, ता. धुळे संचालक मंडळाच्या कामकाजासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, शिक्षणाधिकारी डॉ. मनिष पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, संचालक मंडळ प्रतिनिधी व तक्रारदार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती निधीचा अपहार झाल्याची तक्रार असून शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही. तक्रारदारांनी याबाबत लेखी तक्रार केल्यानंतरच संबंधित रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात आली आहे. तरीदेखील शिक्षण अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे. सेवाजेष्ठता यादीत नाव नसतानाही काही पर्यवेक्षकांना बेकायदेशीररित्या पदोन्नती देण्यात आल्याचे तसेच रिक्त जागांची माहिती नसताना अनेक शिक्षकांची भरती केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भातील माहितीसह चौकशीसमिती समोर उपस्थित राहण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले.
पोलीस अधीक्षक, धुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे, स्थानिक निधी कार्यालय, धुळे, आयुक्त, शालेय शिक्षण विभाग, पुणे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या चौकशी समितीत समावेश असणार आहे.
No comments:
Post a Comment