दर्जेदार आरोग्यसेवेसाठी युद्ध पातळीवर काम करा
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्याचे निर्देश
मुंबई, दि.१६:- आरोग्य सेवा हा लोकांच्या आरोग्याशी संबंधित संवेदनशील विषय आहे. ही सेवा तत्पर ठेवण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांचीच आहे. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार देण्यासाठी या यंत्रणेत अधिकारी व कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिल्या.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नियमित, कंत्राटी सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या नियमित वेतनाचा आढावा घेतला. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, संचालक (लेखा) अभिजीत पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर राज्यातील आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवित आहे. या सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा बजावणाऱ्या कंत्राटी डॉक्टर्स, कर्मचारी यांचे वेतन विहित वेळेत झाले पाहिजे. या डॉक्टर्स- कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात जे अधिकारी दिरंगाई, कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिला.
मंत्री आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, अधिकारी- कर्मचाऱ्यांना विहित वेळेत वेतन दिले दिले पाहिजे. वेतन वेळेत न देणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत मंत्री आबिटकर म्हणले, किमान महिन्याच्या सात तारखेपर्यंत कंत्राटी सेवेतील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन झाले पाहिजे. यासाठी आवश्यक अनुदानाची मागणी संबंधित आरोग्य उपसंचालक यांनी १५ तारखेपर्यंत शासनास सादर करावी.
No comments:
Post a Comment