Thursday, 16 October 2025

सर्वोच्च नेता भूपतीसह ६१ माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सशस्र आत्मसमर्पण





 गडचिरोलीची वाटचाल माओवाद समाप्तीकडे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· सर्वोच्च नेता भूपतीसह ६१ माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सशस्र आत्मसमर्पण

· मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर

गडचिरोली दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल म्होरक्यांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले आहे. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद पूर्णपणे हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत असून महाराष्ट्रासाठी हे अभिमानस्पद असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिकचे बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.


पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय रिझर्व पोलीस दल उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi