क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा
-मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे
मुंबई दि.16 : जागतिक स्तरावर राष्ट्राची उत्कृष्टता साध्य करण्यासाठी, क्रीडा व आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच क्रीडा लोकचळवळ वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खेलो भारत नीति 2025 धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या धर्तीवर राज्य क्रीडा धोरण तयार करण्यात यावे, यासाठी समिती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. यामध्ये एक खेळ एक संघटनेचा प्राधान्याने समावेश करावा असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे क्रीडा धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय बनसोडे, आमदार विजयसिंह पंडीत, आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे आणि स्काऊट गाईडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले, क्रीडा धोरणात प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात क्रीडा उपक्रमांचा समावेश, शालेय व जिल्हास्तरीय क्रीडा प्रतियोगितांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर बालपणापासून शारीरिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबविणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, क्रीडा प्रोत्साहन संस्थांची निर्मिती करणे आदि विषयांचा समावेश करावा. तसेच, आमदार खेळाडू, नैपुण्य प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ यांचा क्रीडा धोरण समितीमध्ये समावेश करावा. तसेच, खेळाडूंचे याबाबत ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात याव्यात, अशी सूचनाही मंत्री ॲड. कोकाटे यांनी केली.
No comments:
Post a Comment