मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून
महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल
- पणनमंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) अंमलबजावणीला आशियाई विकास बँकेचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल, असा विश्वास पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा मॅग्नेट सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या १३ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यावेळी मंत्री रावल बोलत होते. एडीबीच्या निम दोरजी, वेहुआ ल्यू, श्रीमती सुपाक चायवावान, श्रीमती माझा सुवेर्ड्रुप, श्रीमती हारुका सेकीया, पोन्नुराज वेल्लुसामी, श्रीमती लोईस नाकारीयो, श्रीमती मियो ओका, कायवी यो, के.मुरुगाराज, क्रिशन रौटेला, के.बालाजी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या दौऱ्यात फलोत्पादन क्षेत्रातील उपक्रमांचा आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या मूल्यसाखळी विकासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या वित्त व्यवहार विभागाचे अवर सचिव योमेश पंत, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राजगोपाल देवरा आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.
No comments:
Post a Comment