पणन मंत्री रावल म्हणाले की, राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि कृषी मूल्य साखळी बळकट करण्याच्या उद्देशाने मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. आशियाई विकास बँक आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प २०२१-२२ ते २०२७-२८ या कालावधीत राबविण्यात येत असून त्याचा वित्तीय आराखडा १४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका आहे.
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख १४ फळपिके आणि सर्व प्रकारच्या फुलांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रिया उद्योग, लघु व मध्यम उद्योजक, स्वयंसहाय्यता गट आणि वित्तीय संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. मॅग्नेट प्रकल्पामुळे राज्यात गुंतवणूक, मूल्यवर्धन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. मॅग्नेट २.० या विस्तारित टप्प्यांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान, पॅकेजिंग-ब्रॅंडिंग, कार्बन क्रेडिट्स, समृद्धी महामार्गावरील कृषी कॉरिडॉर आणि संस्था बळकटीकरण या घटकांचा समावेश असलेला आराखडा आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. त्याचबरोबर आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रासाठी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
No comments:
Post a Comment