ग्राहकाभिमुख आणि सातत्यपूर्णरित्या दर्जेदार सेवा बजावल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ऊर्जा मंत्री या नात्याने ऊर्जा विभागाशी निगडीत सर्वच कंपन्या, क्षेत्रीयस्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते अधिकारी, अभियंते आणि संचालक मंडळांचे तसेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कार्यरत यंत्रणांचेही कौतुक केले आहे. या सगळ्यात राज्यातील वीज ग्राहकांचा या सर्व यंत्रणांवरील विश्वास देखील महत्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
आरईसी व ‘पीएफआय’ने दिलेल्या गुणांकनात देशात पश्चिम विभागात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. पश्चिम विभागातील गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, छत्तिसगढ, दादरा-नगर हवेली, दिव दमण या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वच निकषांमध्ये सर्वाधिक गुण मिळविले आहेत. यात वीज पुरवठा (रिलायबिलीटी ऑफ पॉवर सप्लाय) मध्ये महाराष्ट्राला ३२ गुण, वितरणाच्या अनुषंगाने वित्तीय व्यवहार्यता – २५, ईझ ऑफ लिव्हिंग, ईझ ऑफ डुईंग बिझनेससाठी – १७, ऊर्जा क्षेत्रातील बदलांसाठीची अनुकूलता – १५, नियमनात्मक प्रशासन यासाठी – ५ गुण अशा रितीने महाराष्ट्राने सर्वाधिक ९३ गुण पटकावून अ श्रेणीचे मानांकन मिळवले आहे.
महाराष्ट्राने २०३० पर्यंत राज्यातील ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्त्रोंतातून निर्मितीचा निर्धार केला आहे. डिसेंबर २०२६ अखेर राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज दिवसा आणि सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन केले आहे. या नियोजनालाही आरईसीच्या या मानांकनामुळे प्रोत्साहन मिळाले आहे.
No comments:
Post a Comment