ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीत महाराष्ट्र अव्वल
पश्चिम विभागीय राज्यांमध्ये पटकावली ‘अ’ श्रेणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऊर्जा क्षेत्रातील यंत्रणांचे अभिनंदन
मुंबई, दि. ११ :- वीज पुरवठा आणि एकूणच ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. देशात पश्चिम विभागातील राज्यांमध्ये महाराष्ट्राने याबाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा ऊर्जा विभाग, या क्षेत्रात कार्यरत कंपन्या, विविध यंत्रणाचे तसेच राज्यातील वीज ग्राहकांचे अभिनंदन केले आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्राची ऊर्जा क्षेत्राची वाटचाल योग्य दिशेने आणि दमदारपणे सुरु आहे, यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले आहेत.
भारत सरकारची ‘आरईसी’ महारत्न कंपनी आणि पॉवर फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी विविध निकषांवर आधारित मानांकन जाहीर केले आहे. यात महाराष्ट्राने ९३ गुण मिळवून, ‘अ’ श्रेणी पटकावली आहे.
महाराष्ट्राने वीजेबाबत २०३५ पर्यंतची मागणी लक्षात घेऊन नियोजन केले आहे. ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने असे नियोजन करणारे राज्य म्हणून देखील महाराष्ट्राने पहिले स्थान पटकावले आहे. राज्याकडे सध्या स्थापित क्षमता ही ४२ हजार मेगावॅट इतकी आहे. यात पुढच्या पाच वर्षांमध्ये आणखी ४५ हजार मेगा वॅटची भर घालता येणार आहे. त्यातून ही क्षमता ८७ हजार मेगावॅट पर्यंत वाढविता येणार आहे
No comments:
Post a Comment