सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागामध्ये सुरू असलेल्या तयारीबाबत यावेळी माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांपर्यंत सर्व यंत्रणांची बैठक घेतली असून ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, वनपट्ट्यांचे वाटप, स्थलांतरित नागरिकांचा प्रश्न सोडविणे, प्रकल्प बाधितांचे प्रश्न सोडविणे, कातकरी उत्थान, वन हक्क दावे, शालेय विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप, धरती आबा योजनेचा लाभ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ आदी स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विविध विभागीय आयुक्तांनी दिली.
जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे आणि नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी अनुक्रमे प्रत्येक सर्कलमध्ये गावांची निवड करून सातबारा अद्ययावत करण्याची मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांची करवसुली आणि ई-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदा आयोजित करण्यात याव्यात. सर्वसामान्यांशी निगडित विषयांचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची सूचना त्यांनी केली.
00000
No comments:
Post a Comment