प्रधान सचिव श्री.देओल यांनी प्रास्ताविकात या कराराबाबत माहिती दिली. तर, केंब्रिजचे रॉड स्मिथ यांनी महाराष्ट्र शासनासोबतचा करार हा आमचा सन्मान असल्याची भावना व्यक्त करुन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. हा करार इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंब्रिज आणि शालेय शिक्षण यांच्यातील सामंजस्य कराराविषयी
शालेय शिक्षण विभाग व केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडीया यांच्यातील सामंजस्य करार हा महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षकांच्या सतत व्यावसायिक विकासावर भर देणे आवश्यक आहे. राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देताना परिणामकारकता व गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य घेण्यात येणार आहे.
केंब्रिजकडे जागतिक दर्जाचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, पाठ्यपुस्तके, डिजिटल सामग्री व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपलब्ध आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत केंब्रिज शिक्षकांसाठी विषयानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुरूप आणि सीबीएसई-सुसंगत शैक्षणिक साधनसामग्री, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘क्लायमेट क्वेस्ट’ सारखा हवामान शिक्षण कार्यक्रम व पूर्व-प्राथमिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय डिजिटल साक्षरता, आयसीटी आधारित शिक्षण, जीवनकौशल्ये व मूल्यशिक्षणाशी संबधित अभ्यासक्रमही राज्यातील शाळामध्ये राबवले जातील.
No comments:
Post a Comment