सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धोरणांच्या निर्मितीतून समाजहित जोपासावे
मुंबई, दि. १८ : सूक्ष्म आणि लघु उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट काढण्याचा निर्णय सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धोरणात्मक सुधारणा (पॉलिसी रिफॉर्म) बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अकृषक परवाना मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन त्यांना वेळेत उद्योग सुरू करणे सोयीचे होणार आहे.
राज्याची सर्वच क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शासन विविध धोरणांची अंमलबजावणी करीत असते. या धोरणांमध्ये भविष्यातील आव्हानांचा वेध घेत व्यापक समाजहित असणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकाचे जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी या धोरणांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्याला देशामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत पुढे नेणारी बरीचशी क्षेत्र दुर्लक्षित राहिली होती. या क्षेत्रांच्या विकासातून समृद्ध राज्य बनविण्यासाठी अशा क्षेत्रावर आधारित धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ही सर्व धोरणे राज्याच्या विकास आणि समाज हितासाठी समर्पित असतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment