मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार
- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. ९ : सायन कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेऊन रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात येईल, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य कॅप्टन तमिल सेल्वन, अनंत नर, मुरजी पटेल यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.देसाई म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) मार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांपैकी ५१७ प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले असून, राज्य शासन आणि संबंधित प्राधिकरणाकडून या प्रकल्पांना गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच या रखडलेल्या प्रकल्पांसाठी 'अभय योजना' राबविण्यात आलीआहे , त्या अंतर्गत २३ प्रकल्पांमध्ये नवीन विकासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे २५ हजारांहून अधिक झोपडीधारकांना योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सात शासकीय संस्था/महामंडळांमध्ये भागीदारी तयार करण्यात आली आहे. यामध्ये सिडको, म्हाडा, ‘एमआयडीसी’, बृहन्मुंबई महानगरपालिका, ‘एमएमआरडीए’, ‘एमएसआरडीसी’, ‘महाप्रित’ (MAHAPREIT) यांचा समावेश आहे, असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment