इतर मागासवर्गाच्या कल्याणासाठी शासन कटीबद्ध
- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. ९ : राज्यातील इतर मागास वर्गाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असून ‘महाज्योती’च्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने 203 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. सावे बोलत होते.
नाशिक येथील ‘महाज्योती’च्या इमारत प्रकल्पासाठी 174 कोटी व नागपूरसाठी 29 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे म्हणाले की, नाशिकमध्ये प्रकल्पाचे काम सुरू आहे, तर नागपूरच्या प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
2022-23 मध्ये 200 कोटी निधीतून 20,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला होता. तर यंदाच्या वर्षी किमान 70 हजार विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. यंदा प्रशिक्षण योजनांतर्गत 50% महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर गतवर्षी ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून ‘युपीएससी’साठी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘महाज्योती’च्या माध्यमातून सर्व योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असल्याचेही श्री. सावे यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment