विधानसभा लक्षवेधी सूचना :
फुलंब्री शहरातील चुकीच्या गट फोडप्रकरणी
तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 9 : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात चुकीच्या पद्धतीने गट नंबर 17 ची फोड करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे या भागातील 157 कुटुंब अडचणीत सापडले आहेत. या गटाची चुकीच्या पद्धतीने परस्पर फोड करणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करण्यात येत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
फुलंब्री शहरातील चुकीच्या पद्धतीने केलेल्या गट फोड व बनावट अकृषक परवानगी बाबत सदस्य श्रीमती अनुराधा चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फुलंब्री शहरात परस्पर व चुकीच्या पद्धतीने गट फोड केल्यामुळे चुकीची अकृषक परवानगी देण्यात आली आहे. याबाबत संबंधितांवर 17 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या 157 घरांच्या संरक्षणासाठी शासन निश्चित कार्यवाही करेल. तसेच लातूर तालुक्यातील चुकीच्या पद्धतीने रेखांकन झालेल्या भागाची चौकशी करण्यात येऊन संबंधित लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment