वृत्त क्र. ३५८
जामिया इस्लामिया इशातूल उलूम संस्थेतील परकीय नागरिकांचे
बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी
- गृहराज्यमंत्री (ग्रामीण), डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १६ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातूल उलूम या धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री(ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य देवेंद्र कोठे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेमध्ये राजेश पाडवी, हरिष पिंपळे आणि गोपीचंद पडळकर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
गृहराज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या अस्सलाम हॉस्पिटल मध्येही बेकायदेशीर निवास व व्यवस्थापनाच्या अनियमितता आढळून आल्या आहेत. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हॉस्पिटलचा नोंदणी परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार आहे. संस्थेच्या बँक खात्यांमध्ये भारतासह परदेशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. याशिवाय, संस्थेने आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचे आणि शिष्यवृत्ती वाटपातही अनियमितता केल्याचे प्राथमिक निष्कर्ष निष्पन्न झाले असून, यासंदर्भातील तपास देखील एटीएस मार्फत सुरू आहे, असे गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment