आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके
मुंबई, दि. १७ : राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सदस्य किरण सरनाईक यांनी आदिवासी आश्रम शाळेत 'काम नाही वेतन नाही' नियम लागू असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना मंत्री उईके बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, सुधाकर आडबाले यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
'काम नाही वेतन नाही' हा निर्णय न्यायालयाच्या निर्णयानुसार घेण्यात आल्याचे सांगून मंत्री उईके म्हणाले की, राज्यातील सर्व शाळा आणि आश्रमशाळा यांची नियमावली एकच आहे. त्यामुळे सर्वच शाळांना हा नियम लागू होतो. शाळा बंद झाली किंवा तुकडी बंद झाली तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे धोरण आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा आणि आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा यासाठी शिक्षक आणि कर्मचारी भरतीचे नियम आणि निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेतील काम नाही वेतन नाही या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री उईके यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment