शिक्षक पदभरतीत राखीव प्रवर्गावर अन्याय होऊ देणार नाही
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. १८ : सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्यात येते. प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीच्या आधारेच नियुक्ती प्राधिकारी आरक्षणनिहाय पदभरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर नोंदवत असतात. मागील शिक्षक भरती प्रक्रिया दोन टप्प्यात राबविण्यात आली. यामध्ये बिंदू नामावली नुसारच भरती करण्यात आली आहे. भविष्यातही शिक्षक पद भरतीमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
शिक्षक पदभरती बाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या सूचनेच्या उत्तरात शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, बिंदू नामावलीच्या प्रस्तावात काही त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करून प्रस्ताव फेर सादर करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना सूचित करण्यात येते. शिक्षक पदभरतीची प्रक्रिया मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात एकूण २१ हजार ८३९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १० हजार ८५६ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. पदभरतीच्या दोन्ही टप्प्यात विमुक्त भटक्या जमाती या प्रवर्गात विमुक्त जाती प्रवर्गात १४९८, भटक्या जमाती (ब) ७२७, भटक्या जमाती (क) ८२१, भटक्या जमाती (ड) ६७२ पदे आहेत.
तसेच या दोन्ही टप्प्यात ३२ हजार ६९५ पदांची जाहिरात देण्यात आली. विजाभज प्रवर्गासाठी ३ हजार ५९६ पदे उपलब्ध होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ३ हजार ७१८ पदे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या प्रवर्गावर अन्याय झाला असल्याचे दिसून येत नाही, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले
No comments:
Post a Comment