विधिमंडळ सदस्यांच्या समितीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या
मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणी करणार
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १८ :- मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील सोयीसुविधा आणि मेसच्या पाहणीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये आणखी एका सदस्यांचा समावेश करून विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस आणि नरिमन पॉईंट येथील मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली जाईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विधानपरिषदेत मुंबई विद्यापीठाच्या नरिमन पॉईंट येथील मुलींच्या वसतिगृहासंदर्भात सदस्य सर्वश्री मिलिंद नार्वेकर, कृपाल तुमाने, राजहंस सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा व सुविधांबाबत शासन गंभीर आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील विद्यार्थिनी वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीची बैठक घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नरिमन पॉईंट येथील मुलींच्या वसतिगृहाच्या सुविधांच्या पाहणीसाठी समितीमार्फत अचानक भेट देण्यात येईल. या समितीमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांचा समावेश करण्यात येईल.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसचा इंटींग्रेटेड आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या एका क्रीडा प्रकारातील स्पर्धा मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या स्पर्धा कलिना कॅम्पसमध्ये घेण्याचा विचार असून त्याअनुषंगाने येथील सुविधा वाढविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सदस्य मिलिंद नार्वेकर, ॲड. मनीषा कायंदे यांनी या प्रश्नावरील चर्चेत सहभाग घेतला.
000
No comments:
Post a Comment