ठाणे जिल्हा रुग्णालया अद्ययावत होत असून त्यामध्ये ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय असे एकूण ९०० खाटांचे हे रुग्णालय तयार होत आहे. त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरण, यंत्रसामग्री बसविणे आदी कामे सुरू आहेत. साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या ९०० खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे १०७८ नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करतानाच अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यावर भर देण्यात यावा. मंत्रालयात या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव श्री. सोना यांना दिले. हे जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्ह्यासोबतच रायगड, नवी मुंबई, पालघर याभागातील नागरिकांसाठी वरदान ठरेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतानाच राज्यातील महापालिका रुग्णालयामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहिम हाती घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहीम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती, त्यांना लागणारी औषधे, साहित्यसामग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री, सचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment