पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा शुभारंभ
आज 22 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंतच्या नऊ दिवसाच्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ या अभियानाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. त्यानिमित्त पवई तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी राज्याचे फूलझाड ताम्हण रोपाचे श्रीमती मुंडे यांच्या हस्ते रोपण करण्यात आले.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रात हे पर्यावरण संवर्धन अभियान राबवण्यात येणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या अभियानात नागरिकांना आपल्या पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे व राज्यातील नागरिकांना पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी करून घेणे, असा या अभियानाचा उद्देश असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. या अभियानात पंचमहाभुतांच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पाच घटकांपैकी किमान एका घटकावर जागरूक नागरिक म्हणून संकल्प करून काम करावे. स्थानिक स्वराज संस्थांनी पुढाकार घेऊन नैसर्गिक जलस्त्रोतांची स्वच्छता, रिड्यूस, रियूज, रिसायकल यावर आधारित शाळा महाविद्यालयात नवीन प्रयोगांची स्पर्धा, ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ याप्रमाणेच घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी करावा, असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने केले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यस्तरावर युवकांशी संवाद साधून निसर्ग संवर्धनाच्या चळवळीत तरूणांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे, असे सांगितले.
आमदार दिलीप लांडे यांनी पवई तलाव स्वच्छता अभियानाची सुरूवात निश्चितच कौतुकास्पद असून या तलावाचे संवर्धन ही येथील नागरिकांची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रास्ताविकात पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांच्या आग्रही पुढाकाराने हा कार्यक्रम घेतला असल्याचे स्पष्ट करून पर्यावरणवादी संघटनांमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमात वनशक्ती, निसर्ग संस्थान, हेल्पिंग हॅन्डस्, पर्यावरण दक्षता मंच, बुऱ्हानी फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना या संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment