पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सरसावल्या;
पवई तलावाच्या स्वच्छता उपक्रमाने सुरू केली लोकचळवळ
जागतिक वसुंधरा दिनी ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ
प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेण्याचे केले आवाहन
राज्यभरात राबवली जातेयं अभिनव संकल्पना
मुंबई, दि. 22 : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने 22 एप्रिल, 2025 जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई येथील पवई तलाव स्वच्छता व संवर्धन अभियानाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन गणेश घाट पवई येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार दिलीप लांडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महानगरपालिका उपायुक्त श्री.संतोष दौड आदी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण रक्षणात कर्तव्य आणि हक्क या दोन्ही गोष्टींची जोड देण्याची गरज व्यक्त केली. निसर्गाने मानवाला भरभरून सर्व काही दिले, पण माणसाने मात्र अतिहव्यासाने सभोवतालच्या निसर्गाचे नुकसान केले. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच लोकसहभाग आवश्यक आहे. यासाठी आपण वेळीच जागृत होऊन पर्यावरण संवर्धनाचे कर्तव्य बजावण्याची नितांत गरज असून सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर महाराष्ट्र नक्कीच प्रदुषणुक्त होईल.
नवरात्रीत ज्याप्रमाणे देवीची आराधना केली जाते. त्याप्रमाणे या सृष्टीची, वसुंधरेची आराधना केली पाहिजे. वसुंधरेला वाचविण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करणार
जलयुक्त शिवार योजना, लेक माझी भाग्यश्री अशा योजनांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जलयुक्त शिवार योजनेतून ग्रामीण विभागात पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळाले, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन पर्यावरण विभाग देखील निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करेल. पवई तलावाची स्वच्छता ही या चळवळीची सुरुवात असून नागरिकांचा वाढता सहभाग हे खूप मोठे योगदान ठरेल, असा विश्वास श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला
No comments:
Post a Comment