प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण आवश्यक,
सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २१ : प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी राज्य असून त्याचा आदर्श देशभरात घेतला जातो, या पार्श्वभूमीवर प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग होईल, त्यादृष्टीने सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला असून येत्या दहा पंधरा वर्षात राज्याला जागतिक स्तरावर अनेकविध संधी उपलब्ध होणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचे मजबूत स्थान निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महत्वपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे, महाराष्ट्राच्या सक्रिय सहभागातून देशाचे ध्येय साध्य होण्यास मोठे सहाय्य मिळते. यासर्वांत प्रशासकीय अधिका-यांचे योगदान, गतिमानता, पारदर्शक लोकाभिमुख कार्यपद्धतीचा स्विकार निश्चितचं महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, किंबहुना ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ध्येय महाराष्ट्र प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते. राज्य शासनाने राबवलेल्या शंभर दिवसाच्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी सर्व विभागांनी केली आहे. या संकल्पनेच्या यशाचे श्रेय हे प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचे असून काम पारदर्शक आणि गतीमानतेने यशस्वी होते याची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान हे अधिका-यांनाही वेगळा आनंद देऊन जाते. अनेक ठिकाणी जेव्हा लोक वीस तीस वर्षांपूर्वी केलेल्या एखाद्या अधिका-याच्या कामाचा दाखला देतात तेव्हा आपल्या कामातून मिळविलेली ही ओळख मोठी गोष्ट असते. चांगल्या भावनेतून केलेले काम हे यशस्वी होतेच. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात .तंत्रज्ञानाचा व्यापक स्विकार आणि वापर हा गरजेचा आहे.अनेक विभागांच्या चांगल्या कल्पनांचे,निर्णयाचे प्रमाणिकरण व्हायला पाहिजे, जेणेकरुन व्यापक स्तरावर त्या कामांचा लाभ इतरांनाही होईल.
प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोन, पारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. लोकसेवेचा भाव मनात असेल तर ही जबाबदारी यशस्वी होते. अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळणे यादृ्ष्टीने पुरस्कार आणि त्यातुन मिळणारे प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे. ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.सर्व पुरस्कारार्थींचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन करुन नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. तर यशदाचे अपर महासंचालक राहुल रंजन महिवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी सुरेश कुमार, के.पी.बक्षी, स्वाधिन क्षत्रीय, अजित कुमार जैन यांच्यासह इतर सनदी अधिकारी, पुरस्कारार्थी उपस्थित होते.
प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान दरवर्षी राबविण्यात येते. या अभियानातंर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.
No comments:
Post a Comment