पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 टीएमसी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. यामाध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर व सांगलीतील अतिवृष्टीच्या आलेल्या पुराचे 30 टीएमसी पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, नागपूरहून गोवापर्यंत असलेला शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळेल. जेएनपीटी पोर्टच्या तीनपट मोठे बंदर वाढवण येथे उभारण्यात येत आहे. या पोर्टला नाशिक येथे जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून या वाढवण पोर्टला सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहचणार आहेत. याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment