केवळ पारंपरिक खेळांसाठी मैदान उपलब्ध
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अभिनव उपक्रम
मुंबई दि.५: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यात नाशिक येथे १ ते ९ मार्च २०२५ रोजी पारंपरिक खेळांचा क्रीडा महाकुंभ सुरू आहे. त्याचबरोबर श्री. लोढा यांनी केवळ पारंपरिक खेळांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे. सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या क्रीडांगणाला पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.
महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथील मैदान तब्बल २० हुन अधिक पारंपरिक खेळांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यात सुरपारंब्या, लपंडाव, दोरीच्या उड्या, विटी दांडू, लगोरी, पावनखिंड दौड या खेळांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी जागतिक खेळांसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या खेळांना सध्या मैदान मिळणंही मुश्किल झाले आहे. त्यामुळेच पारंपरिक खेळांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी केवळ देशी मातीतल्या खेळांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मैदान आरक्षित केले असल्याचे, मंत्री श्री. लोढा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हे कार्य सिध्दीस जात असल्याचे श्री. लोढा यांनी आवर्जून उल्लेख केला.
No comments:
Post a Comment