गोवंडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जामसाहेब मुकादम असे नामांतर
श्री. सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्रदीपक सोहळ्यात गोवंडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराचा भव्य कार्यक्रम करण्यात आला. या संस्थेला थोर समाजसेवक, कायदेपंडित दिवंगत जामसाहेब मुकादम यांचे नाव देण्यात आले.
गोवंडी इथल्या संस्थेला दिवंगत मुकादम यांचे नाव देताना आनंद होत असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने मुकादम यांनी केलेले कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही श्री.लोढा म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. सामाजिक कामात वकिलीचा व्यवसाय अडचण ठरत असल्याने त्यांनी वकिलीची सनद ही परत केली होती. मुकादम यांचे त्याग आणि समर्पण हे गुण व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील असेही श्री.लोढा यांनी म्हटले आहे. यावेळी भैय्याजी जोशी यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेचे स्वागत करत कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले. लोढा यांच्या संकल्पनेतून समाजाला प्रेरणा देणाऱ्या विभुतींची नव्याने ओळख होत असल्याचे श्री. जोशी यांनी नमूद केले.
थोर संत, विचारवंत, शाहिद जवान, समाजसेवक, संशोधनात योगदान दिलेले शास्त्रज्ञ अशा महान विभूतींचे नाव या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना देण्यात येणार आहे. भारतीय सुपुत्रांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा या हेतूने औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात येत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागाच्या व्यवसाय व शिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला दीपक मुकादम, सुरेश भगोरिया यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment