सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीची
आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी
– मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 5 : भिवंडी (जि. ठाणे) येथील सनलाईट हॉस्पिटलमध्ये बालिकेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या प्रकरणात एका बालिकेचा बळी गेला ही दुर्दैवी घटना आहे. याबाबत सदस्यांनी दिलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले असेल, तर त्याबाबत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल. राज्यात अशाच प्रकारच्या मेडिकल निग्लिजन्सच्या घटना घडल्या असतील, तर आवश्यकता पडल्यास राज्यस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल.
दरम्यान, या प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही संबंधितांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांद्वारे याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.
No comments:
Post a Comment