Tuesday, 11 April 2023

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


 


            मुंबई, दि. ११ : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत.


            देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.


            महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


            महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार यावर्षांपासून २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.


0000



 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi