सौर कृषिपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी
शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार.
- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुंबई, दि. 7 :- सौरकृषिपंपांच्या देखभाल-दुरुस्ती मार्गदर्शनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना सौरकृषि पंप वापराबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी वाशिम जिल्ह्यातील औरंगपूर येथे मुख्यमंत्री कृषिपंप योजनेंतर्गत बसविण्यात आलेले सौरपंप नादुरुस्त असल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी उत्तर दिले. औरंगपूर येथील श्रीमती सिंधुबाई भगत यांनी त्यांच्या शेतात मे. स्पॅन पंप्स, पुणे या कंपनीद्वारे बसविलेल्या सौरकृषिपंपाबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीचे निराकरण देखील कंपनीद्वारे करण्यात आले होते, त्यानंतर श्रीमती भगत यांनी त्यांच्या सौरकृषिपंपाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी या पंपाची तपासणी केली असता स्प्रिंक्लरवर लावलेले पाईप हे व्यवस्थित न बसवल्याने पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले, ते व्यवस्थित करुन देण्यात आलेले असून श्रीमती भगत यांनी त्यांच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे, असे सांगून ऊर्जा राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सौरकृषिपंप वापराची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी मेळावे घेतले जातील, तसेच आगामी येऊ घातलेल्या ‘कुसुम’ योजनेतूनही माहिती दिली जाईल, असे सांगितले.
०००
वृत्त क्र. 712
विधानसभा प्रश्नोत्तरे
गडचिरोलीतील १३७४ शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी वीजजोडण्या;
उर्वरितांना प्राधान्याने वीजजोडण्या देणार.
- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुंबई, दि. ७- गडचिरोली जिल्ह्यात २०१८-१९ पासून जानेवारी २०२२ पर्यंत कृषिपंप वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ४ हजार १३८ अर्जदारांपैकी १ हजार ३७४ अर्जदारांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित २ हजार ७६४ अर्जदारांना कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० नुसार प्राधान्याने वीज जोडण्या देण्यात येणार आहेत, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात पैसे भरुनही शेतकऱ्यांना कृषिपंपाना वीज जोडणी देण्याबाबत सदस्य कृष्णा गजबे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी उत्तर दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुन्या वीज जोडणी धोरणामुळे सन २०१८-१९ पासून तीन वर्ष जोडण्या दिल्या जाऊ शकल्या नाहीत. त्यावेळच्या धोरणानुसार सुमारे १.२९ लाख जोडण्या देण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० आणले, नव्या धोरणानंतर एकाच वर्षात १.३४ लाख कृषि पंप वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. जो मागेल त्याला वीज जोडण्या देण्याचे धोरण असून जिल्हा नियोजन समितीमधून अथवा गावस्तरावरच्या निधीतून देखील यासाठी खर्च केला जाईल, असेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment