Tuesday, 8 March 2022

 सक्षम महिला समृद्ध राष्ट्र

            महिलांचा आर्थिक विकास आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजे महिलांचे सक्षमीकरण नव्हे. आर्थिक विकासाबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवून आणणे, त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची जाणीव करून देणे, त्यांना नियोजन व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्या क्षमतेचे संवर्धन करून आर्थिक क्षमता प्राप्त करण्यास सबळ बनविणे तसेच महिला या समाजाचा घटक असल्यामुळे समाजाच्या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होय. लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.

महिला धोरण

            महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठी राज्याने पहिले महिला धोरण सन 1994 मध्ये जाहीर केले. महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.त्यानंतर सन 2001 व 2014 मध्ये दुसरे व तिसरे महिला धोरण विभागामार्फत जाहीर करण्यात आले. आता चौथ्या महिला धोरणाचा मसूदा अंतिम टप्यात आहे. या वर्षीचे धोरण हे केवळ मार्गदर्शक सूचनांच्या स्वरुपात मर्यादीत न राहता त्याला कृती आराखड्याची व संनियंत्रणाची जोड पहिल्यांदाच देण्यात येत आहे. अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या कोणत्या विभागाची असेल, या मुद्यांचा समावेश धोरणातच करण्यात आला आहे.

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 3 टक्के निधी.

            राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक जिल्हयामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक योजनेकरिता (Umbrella Scheme) जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या विकासासाठी शासनातर्फे त्रिस्तरीय धोरण राबविण्यात येत असून महिला सबलीकरण आणि बालकांचा विकास, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध

            महिला बचत गट चळवळीमुळे महिलांचे एक जाळे निर्माण झाले असून त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे कुटुंबात त्यांच्या मताला मान दिला जातो. या बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी मी महत्त्वाचे‍ निर्णय घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. मविमही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. माविम आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे सामंजस्य करार केले आहेत.

सायबर सखी उपक्रमातून महाविद्यालयातील मुलींना प्रशिक्षण

            मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे फसवणूक यातही वाढ होते आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी डिजीटल स्त्री शक्ती उपक्रम 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरूणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम,तांत्रिक फसवणूक आदी बाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

Continue.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi