मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण
मुंबई, दि.9 : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सुरु आहे.याबाबत 23 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयानान्वये अनाथांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयानान्वये अनाथांना वयाच्या 28 वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरीत करुन प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरीत केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यु प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. शासन निर्णयातील इतर अटींची पूर्तता करणाऱ्या अनाथांना तातडीने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही या विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे.याबाबत अधिक माहिती हवी असल्यास अथवा काही तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक :022-22852814 (सकाळी 10 ते सायं. 6) ई-मेल क्रमांक : dycor.ho-mum@gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबईचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले आहे.
००००
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या
प्रचलीत निकषांमध्ये सुधारणा प्रस्तावित
मुंबई, दि. 9 : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलीत निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.लवकरच त्याबाबतचा निर्णय घेऊन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. असा खुलासा शालेय शिक्षण विभागाने केला आहे.
सध्या दि. २१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयातील निकषांनुसार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोनाकाळात शाळा बंद असल्याकारणाने सध्याच्या निकषांमधील बऱ्याचशा घटकांवर शिक्षकांचे गुणांकन करणे शक्य नव्हते, असे शिक्षण विभागामार्फत नमूद करण्यात आले आहे.
सन २०१८-१९ राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दि. २२/०८/२०१९ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले असून एकूण १०७ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.
राज्य आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी शिक्षक निवडीची प्रक्रिया दरवर्षी साधारण जुलै महिन्यात सुरू होते. परंतु सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासूनच कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे सन २०१९-२० साठीच्या पुरस्कारासाठी शिक्षक निवडीची प्रक्रिया वेळेत सुरू करणे शक्य झाले नाही. असे माहिती शिक्षण विभागाचे सहसचिव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment