अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा
मुंबई, दि.9 : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत, कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.
राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जिल्ह्यांचा आढावा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे घेतला.यावेळी मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यावेळी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार म्हणाले,राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज रोजी जिल्हा प्रशासनांकडून पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसानीचे आकडे वाढत आहेत. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी काही प्रातिनिधीक ठिकाणी जावून पंचनामे केले आहेत अशा ठिकाणाची पाहणी करावी. कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये ही खबरदारी घ्यावी. तसेच केलेल्या पंचनाम्यांची शहनिशा करण्यात यावी.शेती,घरे,पशुधन,फळबागा,शेत जमिन खचलेली क्षेत्र, दरडी कोसळेलेल्या शेत जमिनी,ग्रामीण रस्ते, शाळा, शासकीय इमारती, पुल, कॅनॉल, फुटलेले तलाव याबाबत तसेच इतर बाबींच्या नुकसानीची माहिती शासनाला सादर करावी अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्या ठिकाणी तातडीने मदत आवश्यक आहे अशा वेळी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत तातडीने घेण्यात यावी.आपत्तीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना तातडीच्या मदतीचे वितरणही तात्काळ करण्यात यावे.दरड कोसळण्याची अथवा अशी ठिकाणे असतील अशा परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कोरोना परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. ‘एनडीआरएफ’ च्या मदत निकषात वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.शासनाकडून जुलै महिन्यात जाहीर केलेल्या मदतीचे वाटप करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे असेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती बैठकीत दिली.
००००
शेतकऱ्यांना सक्षम करणारा ई- पीक पाहणी महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प
- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
· 18 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या सातबारावर ई-पीक नोंदणी पूर्ण
मुंबई, दि. 9: महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी राज्य शासनाने ' माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा' ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 18 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक पध्दतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे.
जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. शिवाय या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. आता ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना स्वत:च आपण पिकवित असलेल्या पिकांची माहिती ॲपमध्ये भरणे सोपे होते आहे. ई- पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री श्री.थोरात म्हणाले.
0000
No comments:
Post a Comment